पावसाळ्यापूर्वी माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करा : आ.सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : गतवर्षी अतिवृष्टीमुळे तलाव फुटून बोर्डा व चिचपल्ली गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी पावसाळ्यापूर्वी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचाई विभागास दिले.नियोजन भवन येथे मामा तलाव व लपा तलावासंदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभागाचे संदीप खांबाईत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दूलवार आदी उपस्थित होते.आमदार मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील विविध तलाव दुरुस्ती कामांना गती देण्याचे निर्देश दिले. कसरगट्टा (₹६.२५ लाख), बोर्डा बोरकर (₹६.३० लाख) आणि चेक आंबेधानोरा (₹१० लाख) या दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली असून, तिन्ही कामांसाठी तीन दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ कामे सुरू करावीत,असे निर्देश त्यांनी दिले. मागील वर्षी बोर्डा व चिचपल्ली येथे तलाव फुटून पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा विशेष दक्षता घेण्यावर भर देण्यात येणार आहे.दाबगाव मक्ता व आलेवाही येथील मामा तलावांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तत्काळ तयार करावे. तसेच दाबगाव तुकूम, आलेवाही नवरगाव (सर्वे नं. १०), कांतापेठ रयतवारी (सर्वे नं. ३५), चिचपल्ली, मुरमाडी (सर्वे नं. ३१), विहीरगाव येथील मामा तलावांच्या दुरुस्ती कामांसाठी कार्यादेश आधीच जारी करण्यात आले आहेत.काही कामांना सोमवारपासून कार्यारंभ आदेश देण्याचे सुचविण्यात आले आहे. मामला तलाव गेट दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. सर्व उर्वरित कामांना २७ मे पर्यंत मंजुरी मिळवण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले.