शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हे

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर कानगाव मंडळात मुसळधार पावसाने शेतकरी व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्या ओढ्यांना पूर आल्यामुळे गावागावात पिकांचे नुकसान व यशोदा नदीला पूर येऊन हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याने तहसीलदार हिंगणघाट यांच्या आदेशाने तलाठी जयश्री नेहारे,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक दत्तात्रय दिवटे हे कर्मचारी अल्लीपूर मंडळात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व्हे करण्यात व्यस्त आहे . परंतू काही शेतकरी शेतात हजर नसल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्व्हे करतांना अडचणीचा सामना करावा लागतो. शिवारातील शेतकरयांना शेत मालकांचे नावे विचारून जे शेतकरी हजर आहे त्यांचेकडून माहिती मिळवावी लागते व पंच म्हणुन त्या शेतकऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते.मंडळातील शेतशिवार तीन ते पाच किमी अंतरावर आहे कुठे गाडीने तर कुठे पायदळ जावे लागते. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पूर्ण सर्व्हे झाले पाहिजे याकरीता तलाठी , कृषी सहाय्यक, ग्रामसेवक प्रयत्नशील असुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व्हे करण्यात व्यस्त आहे.