विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हे अनिसचे कार्य – डॉ. मंजुषा वरफडे देशमुख
विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हे अनिसचे कार्य – डॉ. मंजुषा वरफडे देशमुख
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा : लहान मुलांना बोलायला लागताच त्यांच्या मनात परिसरातील प्रत्येक गोष्टीबाबत तीव्र जिज्ञासा निर्माण होते. ते सतत प्रश्न विचारत असतात; मात्र पालक आणि कुटुंबीयांनी विवेकपूर्ण, चिकित्सक पद्धतीने उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा बालवयातच मुलांमध्ये अवैज्ञानिक व दैववादी विचारसरणी निर्माण होऊन पुढे ते अंधश्रद्धेकडे झुकू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ. प्रा. मंजुषा वरफडे देशमुख यांनी केले.
त्या उषःकाल महिला बहुउद्देशीय शिक्षण सेवा प्रसारक मंडळ संचालित श्री छाया बालगृह तसेच शारदा कला व सांस्कृतिक मंडळ संचालित उषःकाल बालगृह येथे आयोजित “हसत खेळत विज्ञान” कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. उषाताई फाले होत्या. यावेळी मंचावर अधिक्षक सौ. रूपाली फाले, प्रा. गुलशन चव्हाण, अरुण भोसले, ज्योती भोसले, अनिस भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. गुलशन चव्हाण यांनी विज्ञाननिष्ठ विचारसरणी ही शिक्षणातूनच विकसित होते व शिक्षणामुळे अंधश्रद्धा दूर होतात, असे उदाहरणांसह स्पष्ट केले.
अरुण भोसले यांनी विद्यार्थ्यांना विविध तथाकथित दैवी चमत्कारांचे प्रात्यक्षिक करून त्यामागील
विज्ञान, हातचलाखी, रासायनिक प्रक्रिया आणि कार्यकारणभाव उलगडून दाखवला. “चमत्कार कोणीही करू शकत नाही; त्यामागे विज्ञान किंवा हातचलाखी असते,” असे त्यांनी सांगितले.
तसेच अनिस भोसले यांनी मनातील आकडे आणि वस्तू ओळखण्याचे अभिनव प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना आश्चर्यचकित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती भोसले यांनी केले. सूत्रसंचालन समुपदेशक सोनाली भोयर यांनी तर आभार प्रदर्शन समुपदेशक रोशन मालिये यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केअरटेकर शितल इखार, शैला दाते, रेणुका चौधरी, जागर घाटे, अदिशकुमार यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला सुमारे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.