रुग्णांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व वय वंदना योजनेचा लाभ घ्यावा, अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवाहन
रुग्णांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व वय वंदना योजनेचा लाभ घ्यावा
अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवाहन
तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्लीपूर येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व वय वंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. आवश्यकता भासल्यास रुग्णांना तीन दिवसांपर्यंत दाखल करून मोफत उपचार दिले जातात. यामध्ये अतिसार, टायफॉइड, दीर्घकालीन ताप, गर्भवती महिलांवरील उपचार तसेच लहान-मोठ्या गाठींच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
आतापर्यंत २५ ते ३० रुग्णांनी या योजनांचा लाभ घेतला असून नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत तर ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी वय वंदना योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्लीपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर म्हणाले की, “टायफॉइड, अतिसार, ताप, गर्भवती महिला तसेच लहान-मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना या योजनांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत २५ ते ३० रुग्णांनी लाभ घेतला असून परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे.”
शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.