शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर शाखाप्रमुखांची बैठक संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर शाखाप्रमुखांची बैठक संपन्न
प्रतिनिधी : नदीम शेख
हिंगणघाट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी शिवसेना कार्यालयात जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी राज्यमंत्री अशोकभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर शाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे तसेच तालुकाप्रमुख मनीष देवढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने नवीन शाखाप्रमुखांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त करून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून युवकांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय जाणीव निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
मार्गदर्शन करताना अशोकभाऊ शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्यविषयक धोरणांवर टीका केली. युवकांसमोर रोजगार व शिक्षणाचे गंभीर प्रश्न उभे असतानाही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच धार्मिक भावनांचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे राजकारण सुरू असल्याचेही ते म्हणाले.
समाजासमोरील वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणे ही काळाची गरज असून शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस शहरातील शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.