वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा : सहाय्यक फौजदार रियाज खान यांचे आवाहन

Tue 16-Jun-2026,04:01 AM IST -07:00
Beach Activities

वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा : सहाय्यक फौजदार रियाज खान यांचे आवाहन

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा, दि. १५ जून : वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन आणि जनजागृती याबाबत एनसीसी छात्र सैनिकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी "मानवी चुका हेच अपघातांना आमंत्रण देणारे प्रमुख कारण असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात," असे प्रतिपादन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी केले.

21 महाराष्ट्र बटालियन, सेवाग्राम येथे सुरू असलेल्या एनसीसी युनिटच्या वार्षिक परीक्षेच्या शिबिरादरम्यान १५ जून रोजी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. बापूराव देशमुख फाउंडेशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात छात्र सैनिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट लावणे, वाहन नियंत्रित वेगात चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, अशा महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर दिला.

याशिवाय, अपघात घडल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०८ व ११२ वर माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. छात्र सैनिकांनी आपल्या परिसरात नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती तसेच वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर येथील सुमारे १२५ ते २०० एनसीसी छात्र सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाला पोलीस अमलदार आरिफ खान (वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा), सुभेदार तुरा सिंग, सुभेदार प्रमोद घोडपडे, हवालदार मनजीत सिंग, विशाल पुणे, मिरज सिंग तसेच संदीप कुमार यांची उपस्थिती होती.