मद्यमुक्त दालणास हिंगोलीत रविवारी प्रारंभ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या राष्ट्रीय उपक्रमास चालना
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:हिंगोली केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत, व्यसनमुक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हिंगोली शहराच्या मध्यवर्ती जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या दालनास दि. ९ रविवारपासून सुरुवात होणार आहे.
जगप्रसिद्ध ॲल्कोहोलिक्स ॲनोनिमस् च्या माध्यमातून व्यसनींना मद्यमुक्तीचे धडे देण्यात येतात. येत्या रविवारपासून सकाळी दहा वाजता विनामूल्य मद्यमुक्त साप्ताहिक वर्गास प्रारंभ होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल यांनी सांगितले. मद्यपीडीतांना मद्यासक्तीपासून समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी मद्यमुक्त बांधवांचे दर रविवारी समुपदेशन, परस्पर अनुभवांची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. मद्यसेवनावर नियंत्रण मिळवत विस्कळीत, झालेले संसार अनेक मद्यपीडीतांनी विनामूल्य दालनातून पुन्हा थाटले आहे. मद्यमुक्त दालन विनामूल्य ठेवण्यात आले आहे. मद्यपीडित बांधवांचे नाव, चित्र प्रसार माध्यमावर जाहीर करण्यात येणार नाही. सामाजिक परिवर्तनातील वैचारिक देवाण-घेवाण उपक्रम असल्याने शासकीय यंत्रणेला साध्या वेषात व्यक्तिगत प्रवेश राहणार आहे. मद्यमुक्त दालनास परवानगी बाबत नशामुक्त भारत अभियान समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी असावरी काळे यांच्याकडे दालन उपलब्ध करून देण्याबाबत नुकतेच निवेदन सादर केले होते. नशामुक्त भारत अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे आदींचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. माजी व्यसनमुक्ती राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, संस्थाचालक तथा व्यसनमुक्तीतचे समर्थक प्रा. बी.डी.कदम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्रीमती शांताताई भाले, ज्येष्ठ पत्रकार तथा सर्वोदय कार्यकर्ते तुकाराम झाडे आदीं आदींच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत दिवंगत गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे व्यसनमुक्ती राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे समाजभूषण पुरस्कारार्थी डॉ. विजय निलावर यांनी म्हटले आहे.