वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा धिंगाणा,धाबा मालक व पुतण्यावर खुर्चीने जीवघेणा हल्ला

Fri 07-Aug-2026,03:04 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील सुरगावजवळील एका धाब्यावर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत धाबा मालक व त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाले असून, तिघांविरुद्ध गोंडपिपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, दीपक नारायण फलके ६६ वर्षे रा. गोंडपिपरी हे आष्टी रोडवरील सुरगावजवळ फलके धाबा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सौरभ भास्कर मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंदाजे दहा ते बारा तरुण धाब्यावर आले होते. त्यांनी केक कापून जेवणाची ऑर्डर दिली होती.

धाब्यालगत बार असल्याने काही तरुण तेथून मद्यप्राशन करून परत धाब्यावर आले. रात्री उशिरा त्यांच्या आपापसातील वाद वाढला. धाबा बंद करण्याची वेळ झाल्याने दीपक फलके व त्यांचे पुतणे आतिष भाऊराव फलके यांनी संबंधितांना वाद न घालता निघून जाण्याची विनंती केली. मात्र, याच कारणावरून संतप्त झालेल्या तिघांनी शिवीगाळ करत दोघांवर हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच धाब्यातील प्लास्टिकच्या खुर्चीने डोक्यावर प्रहार केल्याने दीपक फलके व आतिष फलके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

दरम्यान, धाब्यातील स्वयंपाकी मोरेश्वर कोडापे यांनी बचावासाठी स्वयंपाकघरातील तिखट हल्लेखोरांच्या दिशेने फेकल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी रोशन प्रभाकर कष्टी २७ वर्षे , अनिकेत देवराव गोहणे २५वर्षे आणि चेतन राजू वांढरे १९ वर्षे , तिन्ही रा. नवेगाव मोरे, ता. पोभूर्णा, जि. चंद्रपूर यांच्याविरुद्ध मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवाजी निखाडे करीत आहे.