पुलगावात वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा दणका; १२८ वाहनचालकांवर कारवाई

Mon 21-Sep-2026,11:17 PM IST -07:00
Beach Activities

पुलगावात वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा दणका; १२८ वाहनचालकांवर कारवाई

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

पुलगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक मोहीम राबवली. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या कारवाईत तब्बल १२८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, १ लाख ६६ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणारे, विनापरवाना वाहन चालविणारे, अल्पवयीन चालक, ट्रिपल सीट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर, परवाना न बाळगणारे आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले आणि पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले, वाहतूक शाखेचे अंमलदार तसेच पुलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.

कारवाईदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १२२ अंतर्गत ५० प्रकरणे दाखल करण्यात आली. अल्पवयीन चालक आणि विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कलम ३/१८१ आणि ४/१८१ अंतर्गत २१ प्रकरणे नोंदवण्यात आली. इतर कलमांनुसार ५९ प्रकरणे दाखल करण्यात आली. अशा एकूण १२८ प्रकरणांमध्ये कारवाई करून १ लाख ६६ हजार ५५० रुपयांचा दंड करण्यात आला.

नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पुलगाव शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे. वाहतुकीच्या मार्गावर वाहने उभी करू नयेत, गर्दीच्या परिसरात अनधिकृत पार्किंग टाळावे आणि निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे पोलिसांनी सांगितले.

अल्पवयीन मुला-मुलींना वाहन चालविण्यास देऊ नये, विनापरवाना वाहन चालवू नये, महामार्गावर दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. ट्रिपल सीट वाहन चालवू नये आणि कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर असलेली वाहने वापरू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोटार वाहन कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करणे आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे हा आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात टाळणे आणि त्यांच्या भवितव्याचे संरक्षण करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक नियमभंगाविरोधातील ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.