शिरसगाव-अल्लीपूर मार्गावरील जीवघेणा खड्डा; सात दिवसांत पाच अपघात
शिरसगाव-अल्लीपूर मार्गावरील जीवघेणा खड्डा; सात दिवसांत पाच अपघात
तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव-अल्लीपूर मार्गावर पवनी गावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत या खड्ड्यामुळे तब्बल पाच गंभीर अपघात झाले असून, त्यामध्ये आठ ते नऊ नागरिक जखमी झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, परिस्थिती अशीच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डा स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने एखादी जीवितहानी होण्याची वाट न पाहता तातडीने खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास शिवराया संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.