प्रभाग ६ मधील कचरा प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम
प्रभाग ६ मधील कचरा प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम
वर्धा : तालुका प्रतिनिधी इरशाद शहा
वर्धा : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये वाढलेल्या अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून, नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बिरसा मुंडा स्मारकाजवळील रहिवासी भागात ठेवण्यात आलेल्या कचरा ढोल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून, कचरा कुंडीच्या आसपास साचलेल्या घाणीमुळे ‘स्वच्छ भारत अभियानालाही’ तडा जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
याचप्रमाणे अब्दुल कलाम गार्डन परिसरात भंगाराच्या गाड्या उभ्या राहत असून त्यांच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढिग साचत आहेत. त्यामुळे गार्डनचे सौंदर्यही बाधित होत असून नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे वर्धा शहराध्यक्ष किशोर खैरकर यांनी नगर परिषद प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम देत, कचरा ढोला तात्काळ हटवून तो अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. निर्धारित कालावधीत कारवाई न झाल्यास स्थानिक नागरिकांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच जमा झालेला कचरा थेट नगर परिषद कार्यालयात टाकण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे वर्धा जिल्हाध्यक्ष किशोर खैरकर यांच्यासह नितीन इंदुरकर, किशोर मस्के, विशाल शेंडे, प्रशांत भित्रे, कमलेश उमरे, शिवकुमार इंदुरकर, सुबोध आंडे, प्रज्वल टेंभरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आता नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे वर्धा शहराचे लक्ष लागले आहे.