जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धेत हिंगणघाट पंचायत समितीचा समूहगीत प्रकारात प्रथम क्रमांक
जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धेत हिंगणघाट पंचायत समितीचा समूहगीत प्रकारात प्रथम क्रमांक
हिंगणघाट | प्रतिनिधी : निखिल ठाकरे
वर्धा जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक ६, ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी विकास भवन, वर्धा येथे उत्साहपूर्ण व सांस्कृतिक वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध पंचायत समितींच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या चुरशीच्या स्पर्धेत समूहगीत प्रकारात हिंगणघाट पंचायत समितीच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. हिंगणघाट पंचायत समितीच्या चमूने सादर केलेल्या समूहगीतामध्ये शब्द, स्वर व ताल यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. गीतातील भावपूर्ण अभिव्यक्ती, लयबद्धता व सुसंस्कृत मांडणीमुळे परीक्षकांसह उपस्थित रसिक प्रेक्षकही भारावून गेले. सादरीकरणाच्या वेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.
समूहगीताचे संयोजन राजेंद्र मोघे (शिक्षक) यांच्या सुयोग्य नियोजनात व नेतृत्वाखाली करण्यात आले. या चमूमध्ये प्रफुल भोयर (विस्तार अधिकारी, हिंगणघाट), बारस्कर मॅडम (अधिक्षक), कविता घोडे (विषय तज्ज्ञ) तसेच गजानन भूते, जयंत देवढे, दिलीप हाडके, अनुश्री कोपरे, ललिता कुंभारे व दिपाली सावंत या शिक्षकांनी आत्मविश्वासपूर्ण, समन्वयपूर्ण व भावस्पर्शी सादरीकरण करून आपली कलात्मक गुणवत्ता सिद्ध केली.
या यशामागे संगीत शिक्षक विजय गावंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच हार्मोनियम वादनावर सतीश खांडेकर आणि तबला वादनावर आकाश जवादे यांच्या सुरेल व तालबद्ध संगतीमुळे समूहगीत अधिकच उठावदार झाले व सादरीकरणाला विशेष रंगत प्राप्त झाली.
या उल्लेखनीय यशाबद्दल हिंगणघाट पंचायत समितीच्या चमूचे सर्वत्र कौतुक होत असून ज्ञानेश्वर सावसाकडे (गटविकास अधिकारी, हिंगणघाट), अरविंद राठोड (गटशिक्षणाधिकारी) यांच्यासह अधिकारीवर्ग, शिक्षकवर्ग, सहकारी कर्मचारी व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे हिंगणघाट तालुक्याच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव अधिकच वाढला असून भविष्यातही अशाच उल्लेखनीय यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.