खरांगणा (गोडे) ग्रामपंचायत व्हॉल कंपाऊंड कामात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटना आक्रमक
खरांगणा (गोडे) ग्रामपंचायत व्हॉल कंपाऊंड कामात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटना आक्रमक
वर्धा : तालुका प्रतिनिधी – इरशाद शहा
वर्धा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खरांगणा (गोडे) ग्रामपंचायत येथील व्हॉल कंपाऊंड बांधकाम कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात ‘युवा परिवर्तन की आवाज’ सामाजिक संघटना पुढे सरसावत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा तसेच मंजूर अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे. संघटना व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, व्हॉल कंपाऊंडसाठी १२ मिमी लोखंडी सळई वापरणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ ६ मिमी सळई वापरली जात असल्याची चर्चा गावात सुरू आहे. तसेच सिमेंट, वाळू व इतर बांधकाम साहित्याचाही दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
‘युवा परिवर्तन की आवाज’ सामाजिक संघटनेने आपल्या निवेदनात संबंधित ठेकेदार व कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून, संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
संघटनेने प्रशासनाला इशाराही दिला असून, येत्या काही दिवसांत तक्रारीची दखल घेतली नाही तर सर्व ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या तक्रारीची प्रत जिल्हा परिषद वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन सादर करताना युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हा संघटक दिनेश परचाके, वर्धा तालुका प्रमुख इरशाद शहा, उपाध्यक्ष अमन नारायण, तसेच दिनेश देवतळे, प्रशांत गुरनुले, कार्तिक उईके, हर्षल पंधराम, गौरव येटे, फैजल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.