शिवजन्मोत्सवानिमित्त विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा उत्साहात

Fri 20-Feb-2026,02:49 AM IST -07:00
Beach Activities

शिवजन्मोत्सवानिमित्त विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा उत्साहात

हिंगणघाट | प्रतिनिधी – निखिल ठाकरे

शिवजन्मोत्सवाच्या पावन पर्वावर आधार फाउंडेशनतर्फे विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत वक्त्यांनी सहभाग घेत शिवरायांच्या विचारांना उजाळा दिला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. नंदोरी रोड येथील साई मंदिर हॉल येथे स्पर्धा पार पडली. अध्यक्षस्थानी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले होते. उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक अनिल राऊत उपस्थित होते. कार्यकारी अध्यक्षा सौ. माधुरी विहीरकर, सचिव सुनील डांगरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मेनलाईन अकॅडमीचे संचालक चंद्रकांत नणंदकर, टार्गेट अकॅडमीचे संचालक सुशांत बाराहाते आणि यशोज्ञान स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक योगेश वानखेडे उपस्थित होते.

नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ आदी जिल्ह्यांतील विद्यार्थी व युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “नैतिक नेतृत्वाचा अभाव हा आजच्या समाजातील मोठा प्रश्न आहे / नाही” या विषयावर स्पर्धकांनी परखड व अभ्यासपूर्ण मते मांडली.

स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत भोयर, द्वितीय मजीद बेग मुगल व तृतीय क्रमांक कु. कल्याणी चांदेकर यांनी पटकावला. प्रोत्साहनपर बक्षीस साहिल फटिंग व कु. श्रावणी अंबुलकर यांना देण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांनाही सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून ॲड. इंब्राहिम बख्श व प्रा. अभय दांडेकर यांनी तटस्थपणे परीक्षण केले.

संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. कार्यकारी अध्यक्षा सौ. माधुरी विहीरकर यांनीही या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीधर काचोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहास घिनमिने यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.