अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला; २४ जण जखमी, ६ जण गंभीर
अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला; २४ जण जखमी, ६ जण गंभीर
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला केल्याने मोठी घबराट उडाली. या घटनेत सुमारे २४ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमींना अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लीपूर येथील रहिवासी वसंत बेले यांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेण्यात आली होती. पारंपरिक अंत्यसंस्काराचे विधी सुरू असताना अगरबत्तीच्या धुरामुळे जवळील मधमाशांच्या पोळ्यात खळबळ उडाली आणि अचानक मधमाशांचा मोठा थवा बाहेर पडला. काही क्षणांतच मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला.
हल्ला इतका तीव्र होता की अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना जीव वाचवण्यासाठी मृतदेह तसाच स्मशानभूमीत सोडून पळ काढावा लागला. सुमारे दीड ते दोन तास परिसरात कोणीही जाण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे मृतदेह काही काळ तसाच पडून राहिला. नंतर परिस्थिती निवळल्यानंतर काही नागरिकांनी धाडस करून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली.
या घटनेत जखमी झालेल्यांपैकी वामन पिंपळापुरे (६५), रामदास बेले (५०), सतीश खोड (४०), महेंद्र बेले (४८), उमेश बेले (४५) आणि गजानन बेले (४८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अनपेक्षित घटनेमुळे अल्लीपूर परिसरात काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.