सावंगी मेघेतील रुग्णालयात संतापजनक प्रकार; स्टाफ नर्सचा आत्महत्येचा प्रयत्न
सावंगी मेघेतील रुग्णालयात संतापजनक प्रकार; स्टाफ नर्सचा आत्महत्येचा प्रयत्न
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व रुग्णालयात एक संतापजनक व खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्टाफ नर्स अश्विनी एम. चतुर (वय ३५, रा. नंदनवन नगरी, सावंगी मेघे) यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून औषधांच्या गोळ्यांचा अतिरेक करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी त्यांच्या पतीने सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देत न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी चतुर या गेल्या सुमारे १२ वर्षांपासून संबंधित रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी ड्युटीदरम्यान त्यांचा एका सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला होता. त्यावेळी संबंधिताने अश्लील व अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने विभागीय चौकशी सुरू केली. मात्र, ही चौकशी तब्बल १५ महिने चालली असून या काळात त्यांच्यावर सातत्याने मानसिक छळ व दबाव टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चौकशीच्या नावाखाली वारंवार बोलावणे, नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे तसेच बदनामी केल्याचेही सांगितले जात आहे.
११ मार्च २०२६ रोजी चौकशीनंतर त्यांना नोकरीवरून काढण्याची चेतावणी देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात अफवा पसरवल्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या.
१६ मार्च २०२६ रोजी ड्युटीवर असताना पुन्हा कथित छळ झाल्याने त्यांनी सुमारे १२ गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.
या सुसाईड नोटमध्ये गेल्या १५ महिन्यांपासून होत असलेल्या छळाचा उल्लेख करत अमोल बोरकर, आशीष बेडुलकर, किशोर सालंकर आणि पटवर्धन सर यांची नावे नमूद केल्याचे सांगितले जात आहे. तसेच रुग्णालय प्रशासनावरही मानसिक दबावाचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.