लोकसत्ता ‘जिल्हा सूचकांक’मध्ये वर्ध्याचा दबदबा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा दुहेरी सन्मान
लोकसत्ता ‘जिल्हा सूचकांक’मध्ये वर्ध्याचा दबदबा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा दुहेरी सन्मान
वर्धा : प्रतिनिधी – युसूफ पठाण
वर्धा : दैनिक ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘जिल्हा सूचकांक पुरस्कार’ सोहळ्यात वर्धा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत दोन महत्त्वाच्या गटांत पुरस्कार पटकावले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्ध्याच्या जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
प्रशासनिक कार्यक्षमता व औद्योगिक विकास क्षेत्रात जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय सुधारणांमुळे वर्ध्याला हा मान मिळाला आहे.
कोणत्या कामगिरीसाठी मिळाले पुरस्कार?
वर्धा जिल्ह्याची पुढील दोन गटांत सर्वोत्तम म्हणून निवड करण्यात आली:
जिल्हा विकास सूचकांक (गट ३) : सन २०२४-२५ या कालावधीत विविध विकास निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल सन्मान.
एमएसएमई क्षेत्रातील महिला उद्योजकता (२०२६) : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रात ‘महिला संचालित उद्योगांचे सर्वाधिक प्रमाण’ असलेला जिल्हा म्हणून वर्ध्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मानला सर्वांचा वाटा
पुरस्कार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी या यशाचे श्रेय संपूर्ण प्रशासनिक यंत्रणा व जिल्ह्यातील नागरिकांना दिले. महिला उद्योजकतेत वर्ध्याने मिळवलेले अव्वल स्थान हे जिल्ह्याच्या बदलत्या आर्थिक चित्राचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशामुळे जिल्हाभर आनंदाचे वातावरण असून प्रशासनाच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.