‘संवाद’ उपक्रमातून पोलिस-नागरिक थेट संवाद

Fri 27-Mar-2026,03:50 AM IST -07:00
Beach Activities

‘संवाद’ उपक्रमातून पोलिस-नागरिक थेट संवाद

वर्धा (युसूफ पठाण) : पोलिस प्रशासन व नागरिकांमधील विश्वास, सहकार्य आणि समन्वय बळकट करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्यात पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ‘संवाद’ हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत खरंगणा पोलिस ठाणे हद्दीतील मौजा काकधारा (ता. आर्वी) येथे विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे पोलिस प्रशासन थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत २० हून अधिक संवाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसात, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना करखेले, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम, उपविभागीय अभियंता संजय मिसळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन उके तसेच तहसील, आरोग्य, पशुसंवर्धन व वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

संवाद कार्यक्रमादरम्यान पोलिस अधीक्षकांनी गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या सुरक्षेशी संबंधित तसेच इतर समस्यांची माहिती घेतली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, २०१७ मध्ये जलव्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’चा प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या काकधारा गावाचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.

पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी निर्भयपणे आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडाव्यात. ‘संवाद’ उपक्रमाचा उद्देश पोलिस व नागरिकांतील दरी कमी करून गुन्हेमुक्त व सुरक्षित समाज निर्माण करणे हा आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना करखेले, पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, महिला पोलिस अधिकारी शुभांगी जाधव, मनीष श्रीवास व सूरज शुक्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.