नेत्रहीन बांधवांना मदत ही सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी – राठी

Wed 22-Apr-2026,04:59 AM IST -07:00
Beach Activities

नेत्रहीन बांधवांना मदत ही सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी – राठी

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

आर्वी | गरजू नेत्रहीन व्यक्तींना दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा अनेकदा उपलब्ध नसतात. अन्न, निवारा व वस्त्र यांसोबतच त्यांना शैक्षणिक, वैद्यकीय आणि रोजगाराभिमुख साधनांचीही तितकीच गरज असते. अशा बांधवांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करणे म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर त्यांच्या गरजांची जाणीव ठेवून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे होय. नेत्रहीन बांधवांना मदत करणे ही केवळ दानधर्माची बाब नसून सामाजिक परिवर्तन व मानवी विकासाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक श्यामसुंदर राठी यांनी केले.

ते २२ एप्रिल रोजी आर्वी येथील माहेश्वरी भवनात आयोजित नेत्रहीन बांधवांना जीवनोपयोगी साहित्य वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम व श्यामसुंदर राठी मित्र परिवार, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक राजेश बगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, उपविभागीय अभियंता विजय नाखले, ज्येष्ठ समाजसेवक जगन्नाथ बेलवे, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष विलास कुळकर्णी, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण चांडक, डॉ. हेलन केअर अंध व अपंग संस्थेचे सचिव प्रकाशसिंग बावरी, प्रदेश संघटक हरीष तांदळे तसेच समाजसेवक जमील शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत इमरान राही यांनी सांगितले की, जीवनोपयोगी वस्तूंसह आदर, प्रेम आणि आपलेपणाची भावना देणे नेत्रहीन बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे त्यांच्या एकटेपणाची भावना कमी होऊन ते समाजाशी अधिक घट्टपणे जोडले जातात. “जो दुसऱ्याला मदत करतो, तो स्वतःलाच मदत करतो,” या उक्तीप्रमाणे अशा उपक्रमांमुळे समाज अधिक संवेदनशील आणि मजबूत होतो, असे मत राजेश बगाडे यांनी व्यक्त केले. यावेळी विजय नाखले, जगन्नाथ बेलवे, विलास कुळकर्णी व प्रकाशसिंग बावरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सुमारे ५० नेत्रहीन बांधवांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रवि मंशानी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हरीष तांदळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश चांडक, गिरीश राठी, संदीप केला, राजेश चांडक, विठ्ठलदास गांधी, वासुदेव सलामे, राजेश धोपटे, संदीप देशमुख व प्रसन्न बंब आदींनी विशेष परिश्रम घेतले.