समर कॅम्पमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना

Sun 26-Apr-2026,12:46 AM IST -07:00
Beach Activities

समर कॅम्पमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना

 

वर्धा प्रतिनिधी युसूफ पठाण

वर्धा : वर्धा स्थानिक कस्तुरबा ई-स्कूल, बोरगाव मेघे येथे नुकताच 15 दिवसीय समर कॅम्प मोठ्या उत्साहात पार पडला. या समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याची आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली.

संस्थाध्यक्ष सौ. हेमलता मेघे मॅडम व संस्थेचे सचिव प्रा. अनंत मेघे सर यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेल्या या समर कॅम्पची सुरुवात 5 एप्रिल रोजी झाली असून 23 एप्रिल रोजी समारोप करण्यात आला.

या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विविध कलाकृती व उपयुक्त उपक्रम शिकवण्यात आले. यामध्ये पेपर बॅग अॅक्टिव्हिटी, फायरलेस कुकिंग, डान्स, ड्रामा, म्युझिक, इंग्लिश स्पिकिंग, सायन्स मॉडेल मेकिंग, फ्लावरपॉट मेकिंग, आईस्क्रीम मेकिंग, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, गुड हॅबिट्स, चेस, श्लोक संस्कार, योगा, सूर्यनमस्कार, स्पोर्ट्स व इनडोअर गेम्स यांचा समावेश होता.

या उपक्रमासाठी विषयतज्ज्ञ म्हणून चेस शिक्षक श्याम अग्रवाल, डान्स कोरिओग्राफर समीर मेश्राम, संगीत शिक्षिका रूपाली मॅडम व क्रीडा शिक्षक हिमांशू ढोक यांनी मार्गदर्शन केले.

समारोप कार्यक्रम 23 एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरज बोदिले, सौ. प्रतिमा जाधव व सौ. बबीता नेगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुमकुम तिलक व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य, मोबाईल वापराचे दुष्परिणाम दर्शविणारा नाट्यप्रयोग, विविध गीत सादरीकरण तसेच ‘गुड हॅबिट्स’वर आधारित उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच मायांक मोयेकर या विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांसह सादर केलेल्या नृत्याने विशेष दाद मिळवली.

कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका शिवानी बरैया यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंशु यादव यांनी केले.

समर कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी साहेबा शेख, सोनिका जाधव, संगीता वादाफळे, प्रणिता डंभाले, शिवम जाधव, निमा फुलबांधे, जयश्री कटारे, वैष्णवी वाटमोडे, वैष्णवी चालाख, शितल गायकवाड, इलिस इक्का, गीता पाचखंडे, शुभांगी वानखेडे व निरंजना वानखेडे यांनी सहकार्य केले.

या समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांचा वेळ सदुपयोगी लागून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळाल्याचे पालकांनी समाधान व्यक्त केले.