प्रभाग क्र. १९ मध्ये रेल्वे गेट किंवा सुरक्षित अंडरपासची मागणी; नागरिकांचे निवेदन

Mon 04-May-2026,04:39 AM IST -07:00
Beach Activities

प्रभाग क्र. १९ मध्ये रेल्वे गेट किंवा सुरक्षित अंडरपासची मागणी; नागरिकांचे निवेदन

हिंगणघाट | प्रतिनिधी: नदीम शेख

हिंगणघाट शहरातील प्रभाग क्र. १९ (शास्त्री वॉर्ड) परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद असलेले रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे किंवा पर्यायी स्वरूपात सुरक्षित अंडरपास उभारावा, या मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

अविनाश म. नवरखेले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सुमारे १६ ते १७ वर्षांपूर्वी या परिसरात रेल्वे गेट अस्तित्वात होते. मात्र फ्लायओव्हर पुलाच्या बांधकामानंतर ते बंद करण्यात आले.

सदर परिसरात शाळा, रुग्णालये, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ तसेच एपीएमसी मार्केट असल्याने विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, व्यापारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात सतत ये-जा सुरू असते. फ्लायओव्हरवर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना पुलावर चढ-उतार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी पुन्हा रेल्वे गेट सुरू करावे किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने अंडरपास उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.