हजारो बांधकाम कामगारांचे अर्ज रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
हजारो बांधकाम कामगारांचे अर्ज रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मंत्रालयात कामगार मंत्र्यांकडे आमदार राजेश बकाणे व उमेश अग्निहोत्री यांची जोरदार भूमिका
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
मुंबई, दि. १९ मे २०२६ : वर्धा जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच अर्ज रखडवून ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आमदार राजेश बकाणे आणि स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे मंत्रालयात प्रत्यक्ष भेटीदरम्यान केली.
या भेटीत वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार राजेश बकाणे यांनी कामगारांच्या अडचणींबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधले, तर उमेश अग्निहोत्री यांनी नोंदणी, नूतनीकरण, प्रोफाईल दुरुस्ती, विविध कल्याणकारी योजनांचे प्रलंबित अर्ज, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक व आरोग्य अनुदान तसेच इतर लाभांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाची माहिती सविस्तरपणे मांडली.
वर्धा जिल्ह्यातील हजारो पात्र बांधकाम कामगारांचे अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच सर्व प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढून कामगारांना न्याय द्यावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी संबंधित प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नागपूर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीनंतर वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा अधिक मजबूत होईल, असा विश्वास आमदार राजेश बकाणे आणि स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी व्यक्त केला.