शेकापूर (बाई) रेतीघाटावरील जीवघेण्या खड्ड्यात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; रेती माफियांविरोधात संताप
शेकापूर (बाई) रेतीघाटावरील जीवघेण्या खड्ड्यात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; रेती माफियांविरोधात संताप
पर्यावरण वाचवण्याचे आवाहन करणारे प्रशासनच पर्यावरणाच्या ऱ्हासाला जबाबदार?
प्रतिनिधि निखिल ठाकरे हिंगणघाट
हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील रेतीघाटावर अनधिकृत रेती उत्खननामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रेती माफिया आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माहितीनुसार, रेती माफियांनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन केले आहे. रॉयल्टी न भरता हजारो टिप्परद्वारे रेतीची वाहतूक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नदीपात्रामध्ये अक्षरशः महामार्गासारखे रस्ते तयार करण्यात आले असून, या उत्खननामुळे नदीच्या मध्यभागी ३० ते ४० फूट खोल मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
दरम्यान, शेकापूर येथील राहुल अनिल कोळसे (वय ३५) हे आपल्या भाच्यासह नदीपात्रातून जात असताना तोल जाऊन भाचा पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी राहुल कोळसे यांनी प्रयत्न केला असता ते स्वतः खोल खड्ड्यात पडले. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, “या मृत्यूस जबाबदार कोण — प्रशासन की रेती माफिया?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून विविध मोहिमा राबविल्या जातात, तर दुसरीकडे नदीपात्रात सर्रास बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.