वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग ठेकेदाराची मनमानी; नागरिकांकडून कारवाईची मागणी

Fri 29-May-2026,01:15 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग ठेकेदाराची मनमानी; नागरिकांकडून कारवाईची मागणी

RPF, GRP समोरच पार्किंग कर्मचाऱ्यांची अरेरावी? प्रवाशांमध्ये संताप

वर्धा प्रतिनिधी : इरशाद शाह 

वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी अरेरावी, दमदाटी आणि मनमानी कारभार होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पार्किंग व्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांमुळे प्रवासी व वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळेसाठी नो पार्किंग परिसरात उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना जबरदस्तीने ओढून नेले जात आहे. यावेळी वाहनांना घासत नेल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच वाहनांना लॉक लावून वाहनधारकांना त्रास दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून उद्धट भाषेत बोलले जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन, स्टेशन व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP), नगर परिषद प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या वाहनांचे नुकसान होत असताना संबंधित विभागांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली ही मनमानी तात्काळ बंद करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग व्यवस्था पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, वरिष्ठ रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.