दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Sat 30-May-2026,04:33 AM IST -07:00
Beach Activities

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हा वाहतूक पोलिस विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

या मोहिमेदरम्यान २९ मे रोजी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग करताना वाहनांची तपासणी केली. यावेळी दोन वाहनचालक दारूच्या नशेत वाहन चालवित असल्याचे आढळून आले.

मंगेश श्रीधरराव काचोळे (वय ४०, रा. गाडगे नगर मसाळा, वर्धा) यांच्या रक्तात ३२.० एमजी टक्के अल्कोहोल आढळून आले, तर रमेश रामदास गुरव (वय ५८, रा. केजाजी चौक, वर्धा) यांच्या रक्तात ७८.८ एमजी टक्के अल्कोहोल आढळले. दोघांवर मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८५ (दारू पिऊन वाहन चालविणे) तसेच इतर संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली.

याशिवाय जिल्हाभरात हेल्मेट न वापरणे, विनापरवाना वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही नियमित कारवाई करण्यात येत आहे.

नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावावा, दारू पिऊन अथवा अतिवेगाने वाहन चालवू नये व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.