दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात इतवारा चौक येथे वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली.
तपासणीदरम्यान साईनगर देहंकर ले-आऊट येथील मनोज नागराव ताराळे (वय 39) यांच्या रक्तात 131.07 मिलीग्रॅम, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील लाल मोहन कुमार (वय 26) यांच्या रक्तात 307.1 मिलीग्रॅम तर धामणगाव येथील आशीष निजाम पठाण (वय 39) यांच्या रक्तात 31.04 मिलीग्रॅम अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. या तिघांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये तसेच इतर संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात आली.
विशेष मोहिमेदरम्यान अल्पवयीनांकडून वाहन चालविल्याची चार प्रकरणेही आढळून आली. तसेच विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण 26 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या 46, परवान्याशिवाय वाहन चालविणाऱ्या 5 आणि सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्या 42 वाहनचालकांवरही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनात सीट बेल्ट बांधावा तसेच मद्यप्राशन करून किंवा भरधाव वेगाने वाहन चालविणे टाळावे, असे त्यांनी सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.