“एक थेंब वाचवा, उद्याचे भविष्य घडवा” : डॉ. सचिन पावडे यांचे जलसंवर्धनासाठी जनजागृती अभियान

Mon 01-Jun-2026,11:01 PM IST -07:00
Beach Activities

एक थेंब वाचवा, उद्याचे भविष्य घडवा” : डॉ. सचिन पावडे यांचे जलसंवर्धनासाठी जनजागृती अभियान

वर्धा | प्रतिनिधी : अतहर शेख

वाढते जलसंकट आणि सातत्याने वाढणारे तापमान लक्षात घेता, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा वेबक्युअर जनजागृती मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान असून त्यातील प्रत्येक थेंब जपणे ही काळाची सर्वात मोठी गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना डॉ. पावडे यांनी सांगितले की, सन २०१५ मध्ये महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांनी तीव्र दुष्काळाचा सामना केला होता. बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि घटत चाललेली भूजल पातळी यामुळे भविष्यात जलसंकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा सुयोग्य वापर आणि संवर्धन हाच त्यावरील प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, घरातील एक गळणारा नळ वर्षभरात हजारो लिटर पाणी वाया घालवू शकतो. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याची नासाडी रोखण्याचा संकल्प केल्यास मोठ्या प्रमाणात जलसाठा वाचविणे शक्य होईल.

या अभियानांतर्गत नागरिकांना पावसाच्या पाण्याचे संकलन, गळती असलेल्या नळांची दुरुस्ती, जलस्रोतांचे संरक्षण तसेच पाण्याचा पुनर्वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. “पाणी आहे तर जीवन आहे” हा केवळ घोषवाक्य नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याचा पाया असल्याचे डॉ. पावडे यांनी अधोरेखित केले.

जलसंवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून ती दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याची गरज आहे. तसेच इतरांनाही याबाबत जागरूक करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या जनजागृती अभियानाला वर्धा शहरासह जिल्हाभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पर्यावरण संरक्षण व जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

“आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याची सर्वात मोठी संपत्ती ठरणार आहे,” असेही डॉ. पावडे यांनी नमूद केले.

वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी लोकचळवळीचे आवाहन; जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती