विक्रमी उष्णता व वादळी वाऱ्यांमुळे केळी बागांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
विक्रमी उष्णता व वादळी वाऱ्यांमुळे केळी बागांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
जिल्ह्यात मे महिन्यात सलग अनेक दिवस ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या विक्रमी उष्णतेमुळे तसेच अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीच्या मदतीची मागणी करण्यात आली.
निवेदनात उष्णतेची तीव्र लाट, वादळी वारे आणि वादळानंतर अनेक भागांत खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. केळी हे सिंचनावर अवलंबून असलेले पीक असल्याने अखंडित वीजपुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन करता आले नाही. परिणामी पिकांवर ताण निर्माण होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकरी शिष्टमंडळाने बाधित केळी बागांचे तातडीने पंचनामे करून विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली. तसेच उष्णतेची लाट, वादळ, शीतलहरी, गरम वारे यांसारख्या हवामानविषयक आपत्तींचा समावेश असलेली सर्वसमावेशक पीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. सचिन पावडे, मनोज नागपूरे, सुभाष ताल्हन, कुणाल बैस, लोभेश वराडे, श्याम भेंडे, सचिन गरपाल, सचिन राऊत तसेच अन्य केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
उष्णतेची लाट, वादळी वारे आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; विशेष मदत व सर्वसमावेशक पीक विम्याची मागणी