गोरस भंडार प्रकरणी गांधीवादी मूक मोर्चा; न्यायाच्या मागणीसाठी जनआक्रोश
हजारो नागरिकांचा सहभाग; शेतकरी, गौपालक व कर्मचाऱ्यांच्या हितसंरक्षणाची मागणी
वर्धा, प्रतिनिधी : युसूफ पठाण
गोरस भंडारवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी वर्धा शहरात गांधीवादी विचारसरणीवर आधारित शांततापूर्ण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला नागरिक, शेतकरी, गौपालक, कर्मचारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या मोर्चात एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चेकऱ्यांनी गोरस भंडारवरील कारवाईमुळे दूध उत्पादक शेतकरी, गौपालक, कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त केली. कोणतीही प्रत्यक्ष तक्रार नसताना करण्यात आलेली कारवाई व परवाना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोरस भंडारला तात्काळ दूध वितरणाची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली.
मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला. यावेळी प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून गोरस भंडारशी संबंधित शेतकरी, कर्मचारी आणि हजारो कुटुंबांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणात लोकहिताचा व संवेदनशील निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी शालिग्राम टीबडेवाल, धनंजय ढोमणे, विजय मोहता, प्रदीप बजाज, अमित ठाकूर, अमित देशभ्रतार, अविनाश काकडे, प्रविण पेठे, नीरज गुजर, विशाल मानकर, सचिन पहाडे, सिद्धू मून, प्रफुल कुकडे, सुनील मानकर, योगेश महंतारे, समीर देशमुख, जी. व्ही. ठाकरे, राजीव वानखेडे, मंगेश भोसले, सुधीर पांगुळ, प्रविण भोयर, उदय मेघे, शैलेश सिंघल, छगन बत्रा, नितीन चुडीवाले यांच्यासह अनेक मान्यवर, गौपालक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण मूक मोर्चाचे नेतृत्व वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे मंत्री कन्हैया छांगाणी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचा आधार घेत नागरिकांनी प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचविला असून, गोरस भंडार प्रकरणात न्याय्य निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.