दूषित पाणीपुरवठ्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे ग्रामपंचायतीला निवेदन

Sat 06-Jun-2026,03:33 AM IST -07:00
Beach Activities

दूषित पाणीपुरवठ्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे ग्रामपंचायतीला निवेदन

तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर

अल्लीपूर : कात्री येथील वर्धा नदीवरून सात गावांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ काही भागांना मिळत असला तरी गावातील उर्वरित भागात अलमडोह येथील यशोदा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी अल्लीपूर येथे पाणी शुद्धीकरणासाठी मोठ्या क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

मात्र, गावातील अर्ध्याहून अधिक भागात गढूळ, पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ६ जून) ग्रामपंचायत कार्यालय, अल्लीपूर येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत प्रशासक तुषार जोगी व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांना निवेदन सादर करून दूषित पाणीपुरवठ्याची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पूर्वनियोजनाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, शिवसेना सर्कल प्रमुख संदीप नरड, शिवराया संघटनेचे उपाध्यक्ष विकास गोठे, युवा संघर्ष मोर्चाचे दिनेश गुळघाने, शिवराया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सेलकर तसेच गावातील अनेक युवक उपस्थित होते.

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.