पाणीटंचाईवरून नगरसेवक विकी वाघमारे आक्रमक; आंदोलनाचा इशारा

Tue 09-Jun-2026,05:15 AM IST -07:00
Beach Activities

पाणीटंचाईवरून नगरसेवक विकी वाघमारे आक्रमक; आंदोलनाचा इशारा

हिंगणघाट प्रतिनिधी : निखिल ठाकरे

हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर नगरसेवक विकी वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार निवेदने देऊनही पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रभागातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन गळती आढळून येत असून काही ठिकाणी ‘अमृत’ योजनेअंतर्गत नळजोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. तर ज्या ठिकाणी नळजोडण्या आहेत, तेथेही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही ठिकाणी नळांचे अंतर्गत जोडणीचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचेही समोर आले आहे.

नगरसेवक विकी वाघमारे यांनी सहकाऱ्यांसह संपूर्ण प्रभागाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून सर्वेक्षण केले. प्रशासनाकडून ‘अमृत’ योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना शहरात नळ मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “पाणीच मिळत नसताना मीटर बसविण्याचा काय उपयोग?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सर्वेक्षणादरम्यान प्रभाग क्रमांक १५ मधील ३२५ घरांना अमृत योजनेअंतर्गत नळजोडणी नसल्याचे, तर सुमारे ४०० घरांमध्ये नळ असूनही पाणीपुरवठा होत नसल्याचे आढळून आले. तसेच २०० हून अधिक पाईपलाईन गळतीची प्रकरणे निदर्शनास आली आहेत.

या सर्व समस्यांबाबत नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विकी वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे.