अवैध दारू अड्ड्यावर छापा देशी–विदेशी दारूसह सुमारे ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत देशी व विदेशी दारूसह सुमारे ५९ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम ६५(ई), ६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ जानेवारी २०२६ रोजी रात्री पेट्रोलिंगदरम्यान खात्रीशीर माहिती मिळाली की, विद्यानगर वॉर्ड बल्लारपूर येथील अरुण भसारकर यांच्या पडीत घरात अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री सुरू आहे. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
छाप्यादरम्यान त्या ठिकाणी आरोपी आतीश उर्फ पिंटू तुळशिराम येसांबरे (४४), रा. आदर्श चौक, विद्यानगर वॉर्ड, बल्लारपूर व भारतभूषण उर्फ कालू बिसनसिंग गहलोत (४८), रा. कन्नमवार वॉर्ड, जयभीम चौक, बल्लारपूर हे दोघे दारूची विक्री करताना आढळून आले. तसेच काही इसम त्या ठिकाणी बसून दारू पित असताना दिसून आले. पोलीसांना पाहताच दारू पिणारे इसम पळून गेले.
तपासणीत देशी व विदेशी दारूच्या विविध कंपन्यांच्या सिलबंद बाटल्या, बिअर टिन, दारू विक्रीसाठी वापरलेले साहित्य, फ्रिज, वॉटर कुलर, टेबल, खुर्च्या, प्लास्टिक कॅरेट तसेच अवैधरित्या दारू विक्रीतून जमा झालेली रोख रक्कम मिळून आली.यात सुमारे ५९ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, मदन दिवटे, पो हवा संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, पोअं खंडेराव माने, शरदचंद्र कारुष, गुरू शिंदे, लखन चव्हाण यांनी केले.