विसापूरमध्ये आई-वडील व भावाच्या हातून तरुणाचा खून

Fri 09-Jan-2026,06:11 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: विसापूरातील वॉर्ड क्रमांक ५ येथे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंगावर काटा आणणारी घटना घडली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २५ वर्षीय गणेश विश्वनाथ भोयर याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी केली असता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, या जघन्य गुन्ह्यात गणेशचे स्वतःचे आई-वडील व सख्खा भाऊच सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस तपासानुसार मृतक गणेश भोयर हा दीर्घकाळापासून बेरोजगार होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने घरामध्ये वारंवार वाद होत असत. हा कौटुंबिक वाद कालांतराने टोकाला गेला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. याच वादातून आई-वडील व भावाने संगनमत करून गणेशचा खून केल्याचा तपासणीत उघड झाले. गुन्हा अपघातासारखा भासावा, यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकण्यात आला.

रेल्वे रुळावर युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी रेल्वे अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र घटनास्थळावरील संशयास्पद बाबीमुळे पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचे वडील विश्वनाथ भोयर (७०), आई कौशल्या विश्वनाथ भोयर (वय ५५) तसेच भाऊ गुरुदास विश्वनाथ भोयर (वय २८) यांना अटक केली आहे. 

सदर संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि बारकाईने केलेल्या तपासामुळे अल्पावधीतच या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे.

या घटनेनंतर विसापूर गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आई-वडील व भावानेच अशा प्रकारचा अमानुष गुन्हा केल्याचे समजताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.