शाळा ही पारिवारिक ऋणानुबंध जपणारी संस्था — इमरान राही

Wed 11-Feb-2026,01:31 AM IST -07:00
Beach Activities

शाळा ही पारिवारिक ऋणानुबंध जपणारी संस्था — इमरान राही

काजळी येथे विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

नावेद पठाण मुख्य संपादक

कारंजा : आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर शालेय जीवनातील मित्र, गुरूजन आणि आठवणी अचानक उजळून निघतात. त्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्यासाठी आणि आपल्या शाळेला भेट देण्यासाठी मन आतुर होते. ज्या शिक्षकांचा व शाळेचा आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना दाटून येते. याच भावनेतून आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा साजरा केला जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यकार इमरान राही यांनी केले.

ते काजळी येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. “शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, पारिवारिक ऋणानुबंध जपणारी संस्कारांची शाळा आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श शिक्षक मोहन मोहिते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रसिक डोंगरदेव होते. प्रमुख अतिथी म्हणून इमरान राही, राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक उल्हास वाघ, अंकुश गिरडे, निकलेस भानसे, अमोल पेंढारकर, पायल धारपुरे, श्री. चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी आदर्श शिक्षक मोहन मोहिते यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. निलेश रमदम, मनोज बगाडे, लीलाधर दिग्रेस, रौशन धारपुरे, मिलिंद पठाडे, रौशन वरठी, कांचन फरकाडे, आशु कोसे आदी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे दिलखुलास संचालन शिक्षिका आशा उपासे यांनी केले, तर आभार अमोल पेंढारकर यांनी मानले. या स्नेहमिलन सोहळ्यास आजी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.