पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना हिंगणघाटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

Sun 15-Feb-2026,10:34 AM IST -07:00
Beach Activities

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना हिंगणघाटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

हिंगणघाट | अब्दुल कदीर बक्श

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ला मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी पॅरामिलिट्री मित्र परिवार कल्याणकारी चॅरिटेबल ट्रस्ट, हिंगणघाट यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सर्व सेवानिवृत्त तसेच सुट्टीवर असलेले कार्यरत जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी १० वाजता अमर जवान स्मारक, कारंजा चौक येथे शहीद जवानांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिंगणघाट ते अमर जवान स्मारक, कारंजा चौक दरम्यान कॅण्डल मार्च काढण्यात आला.

या कॅण्डल मार्चमध्ये माजी पॅरामिलिट्री मित्र परिवार कल्याणकारी चॅरिटेबल ट्रस्ट, हिंगणघाटचे सदस्य, त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक संघटना, अभिनव विचार मंच तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्रेम बसंतानी (माजी नगराध्यक्ष) यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच श्री. रवींद्र नौकरकर यांच्या कमांडवर मानवंदना देण्यात आली. यावेळी श्री. प्रेम बसंतानी, श्री. सोरटे गुरुजी, श्री. ठाकरे सर (माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट), अभिनव विचार मंचचे श्री. नितीन सुकळकर, तसेच श्री. विवेक भगत (अध्यक्ष, माजी पॅरामिलिट्री मित्र परिवार) यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जानराव चांभारे यांनी केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी “शहीद जवान अमर रहें” आणि “भारत माता की जय” अशा जोरदार घोषणा देत शहीद जवानांना अभिवादन केले.

हा श्रद्धांजली कार्यक्रम हिंगणघाट शहरात देशभक्ती व एकतेचे प्रतीक ठरला.