गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे हे राष्ट्रीय कर्तव्य – सुनील कुमरे; नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे हे राष्ट्रीय कर्तव्य – सुनील कुमरे; नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
( नावेद पठाण मुख्य संपादक )
वर्धा | गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केले.
महादेव मंदिर सभागृहात नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धा शाखेतर्फे आयोजित गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून इमरान राही, शैलेन्द्र खडसे, नगरसेवक अभिषेक त्रिवेदी, नगरसेविका मोहिनी आडे, माजी नगरसेवक शरद आडे, समाजसेवक अश्विन साहू, प्रफुल गेडाम, वैशाली सिडाम, नरेश कुमरे, धर्मदेव कुमरे, मुकंद मसराम, मोहन मसराम तसेच ज्येष्ठ समाजसेवक राजू लभाणे उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी अनेक गरीब कुटुंबांना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे परवडत नसल्याने अशा उपक्रमांमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होतो, असे सांगितले. तसेच इमरान राही, शरद आडे आणि अश्विन साहू यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात सुमारे 200 गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना राहुल कोहचडे यांनी केली. सूत्रसंचालन पल्लवी कुमरे यांनी तर आभार प्रदर्शन थेमसिंग कोहचडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेश कुमरे, प्रवीण आडे, मनोज सिडाम, भूषण कुमरे, नवीन टेकाम, पल्लवी कुमरे, मुरलीधर कुमरे, साजन कोडापे, संजय आत्राम, पवन कोहचडे, अक्षय सिडाम आणि अमीर आत्राम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.