'स्वच्छ भारत अभियानाची' पोलखोल; वडनेर गावात कचऱ्याचे ढीग, साचलेल्या पाण्यामुळे रोगराईचा धोका
'स्वच्छ भारत अभियानाची' पोलखोल; वडनेर गावात कचऱ्याचे ढीग, साचलेल्या पाण्यामुळे रोगराईचा धोका
वडनेर | प्रतिनिधी : नाजिम खान
देशभरात 'स्वच्छ भारत अभियान' प्रभावीपणे राबवले जात असल्याचा दावा केला जात असला, तरी वडनेर गावात मात्र स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावातील जामा मस्जिद चौक, बाजार चौक, बसस्टॉप परिसर, जुनी जनता शाळा परिसर तसेच विविध गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा कुजत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कचऱ्याच्या समस्येसोबतच गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि साचलेल्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या समस्येबाबत ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.