रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मागण्यांवर खासदार अमर काळे यांच्या मध्यस्थीने तोडगा; साखळी उपोषणाची सांगता
रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मागण्यांवर खासदार अमर काळे यांच्या मध्यस्थीने तोडगा; साखळी उपोषणाची सांगता
वर्धा | विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकान व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाची खासदार अमर काळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी सांगता झाली. खासदारांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत प्रशासनासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर बहुतेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने संघटनेने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
संघटनेच्या वतीने सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले कमिशन तातडीने अदा करणे, रास्तभाव धान्य दुकानदारांचे कमिशन प्रति क्विंटल 300 रुपये करणे, प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत कमिशन संबंधितांच्या बँक खात्यात जमा करणे, पोर्टेबिलिटीमुळे होणाऱ्या अतिरिक्त धान्य वितरणासाठी स्वतंत्र पावतीची सुविधा उपलब्ध करून देणे, प्रति क्विंटल एक किलो तूट मंजूर करणे तसेच एप्रिल महिन्यातील प्रलंबित व्यवहारांचा डेटा पीओएस मशीनमध्ये अद्ययावत करणे आदी मागण्या मांडण्यात आल्या होत्या.
यावेळी खासदार अमर काळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. साबळे यांच्यासोबत प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर बहुतेक मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास प्रशासनाने सहमती दर्शविली. उर्वरित तांत्रिक स्वरूपाच्या मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संघटनेने साखळी उपोषण मागे घेतले. यावेळी खासदार अमर काळे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून आंदोलनाची सांगता केली.
यावेळी बोलताना खासदार अमर काळे म्हणाले की, रास्तभाव धान्य दुकानदारांच्या न्याय्य मागण्या व त्यांच्या कामकाजातील अडचणी सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असून शासन व प्रशासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
या प्रसंगी टिकारामजी धागरे, सुनील कोल्हे, नितेश कराळे, संघटनेचे पदाधिकारी, रास्तभाव धान्य दुकानदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.