तळेगाव (टा.) स्टॉप ते गाव रस्त्याची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची नागरिकांची मागणी
तळेगाव (टा.) स्टॉप ते गाव रस्त्याची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची नागरिकांची मागणी
खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला; काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
तळेगाव (टा.), वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
तळेगाव (टा.) स्टॉप ते तळेगाव गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा महासचिव राहुल सुरकार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार वारंवार घसरून अपघातग्रस्त होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना, शेतमाल बाजारात नेणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल सुरकार यांनी सांगितले की, "तळेगाव चौक ते गावापर्यंतचा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, येथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करण्यात येईल."
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विजय नारंजे, युवक काँग्रेस देवळी-पुलगाव महासचिव शुभम अरगुडे, सेलुकाटे अध्यक्ष संदीप शिंदे, हर्ष उबाळे, लीलाधर कुबडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास मानकर, राहुल कांबळे, शंकरराव वंजारी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.