बचत गटाच्या व्यवहारात गोंधळ? भारत फायनान्सवर गंभीर आरोप; ऑनलाइन हप्ते भरूनही खात्यात जमा न झाल्याचा दावा

Sat 08-Aug-2026,09:52 PM IST -07:00
Beach Activities

बचत गटाच्या व्यवहारात गोंधळ? भारत फायनान्सवर गंभीर आरोप; ऑनलाइन हप्ते भरूनही खात्यात जमा न झाल्याचा दावा

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा, वर्धा शहरातील पिपरी मेघे, तुकाराम वॉर्ड परिसरातील भारत फायनान्स/इंडसइंड बँक फायनान्शियलच्या नावाने चालणाऱ्या बचत गटाच्या व्यवहाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सालोड हिरापूर येथील रहिवासी मंगेश टिपले यांनी बचत गटाच्या हप्त्यांच्या ऑनलाइन भरणा व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

मंगेश टिपले यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नी काही अडचणींमुळे बचत गटाच्या बैठकीला नियमित उपस्थित राहू शकत नव्हत्या. त्यामुळे ते संबंधित गटाच्या सरांना ऑनलाइन पद्धतीने दर आठवड्याचे हप्ते जमा करीत होते. अनेक महिन्यांपासून आपण नियमित ऑनलाइन पेमेंट केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र, पिपरी मेघे, तुकाराम वॉर्ड परिसरातील संबंधित कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर अनेक महिन्यांचे हप्ते भरले गेले नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा मंगेश टिपले यांनी केला आहे. यामुळे त्यांनी केलेल्या ऑनलाइन पेमेंटचे पैसे नेमके कुठे जमा झाले, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

चौकशीदरम्यान ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ऑनलाइन हप्ते जमा केले जात होते, त्या संबंधित गटाच्या सरांना सेवेतून हटविण्यात आल्याचे समोर आल्याचे टिपले यांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित व्यक्तीला सेवेतून काढण्यात आल्यानंतर बचत गटातील सभासदांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली होती का? तसेच त्यांच्यामार्फत घेतले जाणारे ऑनलाइन हप्ते कोणाच्या खात्यात जमा होत होते? याची नोंद कंपनीच्या मुख्य शाखेकडे होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

मुख्य शाखेच्या व्यवस्थापनाला थेट सवाल

सभासदांकडून ऑनलाइन पद्धतीने नियमित हप्ते घेतले जात असतील, तर त्या प्रत्येक व्यवहाराची अधिकृत नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची? संबंधित कर्मचारी किंवा सर यांना सेवेतून हटविण्यात आले असल्यास त्याची माहिती बचत गटातील सभासदांना का देण्यात आली नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभासदांनी भरलेले हप्ते त्यांच्या कर्ज खात्यात जमा झाले नसतील, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

या प्रकरणाची संबंधित फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून ऑनलाइन व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी मंगेश टिपले यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित शाखा व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बचत गटाच्या व्यवहारातील या कथित गोंधळाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणार का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.