बल्लारपुरात १६ ऑगस्टला एकदिवसीय भव्य बाल धम्म संस्कार शिबिर
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, करुणा, मैत्री, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकासाची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने बल्लारपूर येथे एकदिवसीय भव्य बाल धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री संत तुकाराम महाराज सभागृह, बल्लारपूर येथे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
शिबिराचे नेतृत्व धम्मचारी पद्मरत्न करणार असून धम्ममित्र भास्कर भगत, सरोज मगराळे, दर्शना रामटेक व संपत कोरडे यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिरामध्ये मुलांना बुद्ध, धम्म आणि संघाचे प्रेरणादायी विचार, नैतिक मूल्ये व चांगले संस्कार, शिस्त व एकाग्रता, आत्मविश्वास, करुणा व मैत्री, सामाजिक जाणीव तसेच व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नैतिक मूल्ये, शिस्त, करुणा आणि बुद्धांच्या धम्माचा परिचय करून देण्यासाठी या शिबिरात आवर्जून सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.