ताडोबा-अंधारीत जटायू संवर्धन प्रकल्पांतर्गत पाच गिधाडे निसर्गात मुक्त
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी(BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथे राबविण्यात येणाऱ्या जटायू संवर्धन प्रकल्पाअंतर्गत पाच पांढऱ्या पाठीच्या गिधाडांना (व्हाईट रम्प्ड व्हल्चर) मंगळवार, ३० डिसेंबर रोजी निसर्गात यशस्वीपणे मुक्त करण्यात आले. BNHS चे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांच्या शुभहस्ते गिधाड प्री-रिलीज एवियरीचे दार उघडून या गिधाडांचे मुक्तीकरण करण्यात आले.सदर गिधाडे हरियाणा राज्यातील पिंजोर येथून एप्रिल २०२५ मध्ये आणून बोटेझरी येथील प्री-रिलीज एवियरीत ठेवण्यात आली होती. निसर्गात मुक्त करण्यापूर्वी त्यांचे आरोग्य निरीक्षण व नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. अभ्यास व संशोधनाच्या दृष्टीने दोन गिधाडांना सॅटेलाइट टॅग तर तीन गिधाडांना जीएसएम टॅग लावण्यात आले असून, यामुळे त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
गिधाडे ही पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाची पक्षी प्रजाती असून परिसंस्थेचा समतोल राखण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. मात्र मागील काही वर्षांत विविध कारणांमुळे गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता जटायू संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण, पुनर्वसन व निसर्गात पुनर्स्थापनाचे कार्य प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या उपक्रमामुळे गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.या वेळी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगावकर पश्चिम मुंबई, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, सहायक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे, विवेक नातू, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोळसा रुंदन कातकर, मनन तसेच इतर जीवशास्त्रज्ञ व कोळसा परिक्षेत्रातील वनकर्मचारी उपस्थित होते.