अल्लीपूर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मध्यरात्री थरारक कारवाई; ५.४६ लाखांचा अवैध दारू साठा जप्त
अल्लीपूर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मध्यरात्री थरारक कारवाई; ५.४६ लाखांचा अवैध दारू साठा जप्त
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : यूसुफ पठाण
जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी (११ फेब्रुवारी) पहाटे सुमारे दीडच्या सुमारास अल्लीपूर शिवारात सिनेस्टाईल कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५ लाख ४६ हजार रुपये किमतीचा देशी दारूचा साठा तसेच तस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
नेमकी घटना काय?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक नियमित गस्तीवर असताना अल्लीपूर शिवारामार्गे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अल्लीपूर येथील मोक्षधाम (स्मशानभूमी)कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचला.
अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार
पहाटे दीड वाजेच्या सुमारास संशयास्पद चारचाकी वाहन (क्रमांक MH 02 BT 5249) येताना दिसले. पथकाने वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता, आरोपींनी प्रसंगावधान राखत वाहन उभे करून दाट झाडी व अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
जप्त केलेला मुद्देमाल :
देशी दारू : ७४ बॉक्स
चारचाकी वाहन : १
एकूण किंमत : ५,४६,००० रुपये
फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विभागाकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
कारवाई करणारे पथक :
ही यशस्वी कारवाई निरीक्षक श्रीराम शेख, सबरान सहन, हरीश दुधे, हरीदास सुरजुसे, जवान रणजित नागमोने, गिरीश साबणे तसेच महिला जवान सुजाता काभरस्कारे यांच्या पथकाने केली.