पेमेंट सक्सेसफुल’चा बनाव करून सोनाराची फसवणूक
पेमेंट सक्सेसफुल’चा बनाव करून सोनाराची फसवणूक
वर्धा एलसीबीची धडक कारवाई; अमरावतीतील दोन भामट्यांना अटक
वर्धा : जिल्हा विशष प्रतिनिधी युसूफ पठाण
वर्धा/देवळी : डिजिटल पेमेंट ‘सक्सेसफुल’ झाल्याचा खोटा संदेश दाखवून सोनाराची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत भामट्यांना वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अमरावती येथून अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याची अंगठी व मोबाईल असा एकूण ४७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवळी येथील सराफा व्यावसायिक विवेक प्रकाशचंद कांकरीया यांच्या दुकानात १० जानेवारी २०२६ रोजी दोन तरुण आले होते. त्यांनी ३२,३०० रुपये किमतीची २ ग्रॅम २३० मिली वजनाची सोन्याची अंगठी खरेदी करण्याचा बहाणा केला. पैसे देताना त्यांनी दुकानदाराचा क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवर ‘पेमेंट सक्सेसफुल’ झाल्याचा बनावट संदेश दाखवला. या संदेशावर विश्वास ठेवून फिर्यादीने अंगठी व खरेदी बिल दिले. मात्र, बँक खाते तपासले असता कोणतीही रक्कम जमा न झाल्याचे उघड झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने २८ जानेवारी २०२६ रोजी देवळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अमरावती येथील असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबी पथकाने अमरावती येथे छापा टाकून
उमेर मिर्झा जफर बेग मिर्झा (वय ३५, रा. सागर नगर, अमरावती) व
शेख तहसीम शेख अकबर (वय २५, रा. हैदरपुरा, अमरावती)
या दोघांना अटक केली.
आरोपींकडून सोन्याची अंगठी, ओप्पो कंपनीचा मोबाईल व मूळ खरेदी बिल जप्त करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंट स्वीकारताना केवळ ग्राहकाच्या मोबाईलवरील ‘सक्सेसफुल’ संदेशावर विश्वास न ठेवता, बँकेचा एसएमएस, अॅप नोटिफिकेशन किंवा साऊंड बॉक्सची खात्री करूनच व्यवहार पूर्ण करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाई करणारे पथक :
पोलीस निरीक्षक विनोद चौधरी,
पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू,
पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे व मंगेश चावरे
(स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)