भीम आर्मीचा नगरपरिषदेला इशारा : २५ तारखेपर्यंत स्वच्छता न झाल्यास कचरा थेट नगरपरिषदेत टाकणार
वर्धा शहर प्रतिनिधि अमन नारायणे वर्धा
वर्धा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, याबाबत नगरपरिषदेने गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेने केला आहे. काही दिवसांपूर्वी माननीय नगराध्यक्ष यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्वच्छतेबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, तब्बल १४ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासारख्या पवित्र व ऐतिहासिक स्थळाजवळ अस्वच्छता ठेवणे हे महापुरुषांचा अवमान असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भीम आर्मीने दिली आहे.
यासंदर्भात भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेतर्फे नगरपरिषदेला स्पष्ट इशारा देण्यात आला असून, येणाऱ्या २५ तारखेपर्यंत तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा संघटनेतर्फे स्वतः परिसराची स्वच्छता करून जमा झालेला कचरा थेट नगरपरिषद कार्यालयात टाकण्यात येईल, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेची राहील, असेही भीम आर्मीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे, जिल्हा संघटक आशिष भाऊ सलोडकर, जिल्हा उपाध्यक्ष बबलू राऊत, जिल्हा महासचिव अलकेश पणबुडे, प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, तसेच अनुराग डोंगरे, आशिष भाऊ मेश्राम, शुभम डूबडूबे, अविनाश मनवर, सनी खैरे, आदर्श वाघमारे, रोशन झामरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.