पीएमश्री लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Thu 22-Jan-2026,03:57 AM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाट | प्रतिनिधी : निखिल ठाकरे

नगरपरिषद हिंगणघाटद्वारे संचालित पीएमश्री लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शिक्षण सभापती पल्लवी बाराहाते, नगरसेविका दुर्गा चौधरी, प्रशासन अधिकारी प्रवीण काळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक सामूहिक लोकनृत्य, एकल नृत्य, एकांकिका, नाट्यछटा आदी सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांनी विशेष कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गिरीधर कोठेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन शेषराव म्हैस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने कविता चव्हाण यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैशाली भडे, संजय पुनवटकर, प्रियंका गावंडे, ज्ञानेश्वर राऊत, माधवी वैरागडे, मंगेश कटारे, नम्रता मानकर यांनी सहकार्य केले. तसेच शिक्षक चंद्रशेखर कोठेकर, मिना आडकीने व सरिता केशवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.