वर्धा पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

Thu 22-Jan-2026,04:28 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठान

जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी वर्धा पोलीस दलाने कठोर भूमिका घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदोरा शिवारात धडक कारवाई करत २ किलो ११ ग्रॅम गांजासह एकूण ५ लाख ७२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, एका फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा तपशील :

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना दि. २१ जानेवारी २०२६ रोजी नांदोरा शिवारात गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकत तीन संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

अटक केलेले आरोपी :

१) मंगेश उर्फ रावण चिंतामण चांदोरे (रा. नांदोरा, सेवाग्राम)

२) मुकेश उर्फ चिट्टा दिलीपराव खैरे (रा. नवीन वस्ती, सेवाग्राम)

३) शेख शहानवाज शेख चांद (रा. झाकीर हुसेन कॉलनी, वर्धा)

तसेच, आरोपींना गांजाचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार गुड्डू जयराम नाग (रा. काटापंजी, जि. बलांगीर, राज्य ओडिशा) याच्यासह चौघांविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल :

पोलिसांनी आरोपींकडून

– २ किलो ११ ग्रॅम गांजा,

– एक इलेक्ट्रिक ऑटो (MH 32 AK 1891),

– एक स्प्लेंडर मोटारसायकल (MH 32 BB 0747),

– तीन मोबाईल फोन,

असा एकूण ५,७२,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारवाई करणारे पथक :

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्री. सलाम कुरेशी तसेच पोलीस कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले व अभिषेक नाईक यांनी केली.