भीम आर्मी भारत एकता मिशनकडून वृद्धाश्रमात भोजनदानाचा सामाजिक उपक्रम
भीम आर्मी भारत एकता मिशनकडून वृद्धाश्रमात भोजनदानाचा सामाजिक उपक्रम
वर्धा | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा
भीम आर्मी भारत एकता मिशन, वर्धा जिल्ह्याच्या वतीने दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे (रावण) यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात भोजनदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम भीम आर्मीचे संस्थापक व खासदार भाई चंद्रशेखर आजाद (नगिना) यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्याध्यक्ष अशोक कांबळे तसेच महाराष्ट्र निरीक्षक शंकर मून यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदासाठी न साजरा करता, समाजासाठी उपयुक्त ठरावा या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. बेघर, अनाथ व वृद्ध नागरिकांना भोजनदान करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा संकल्प यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील यांनी सांगितले की, “वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील किमान एक टक्का रक्कम समाजकार्यासाठी दिली, तर अनेक गरजूंची भूक भागू शकते. ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला.”
गेल्या काही महिन्यांपासून भीम आर्मी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी सातत्याने संघर्ष करत असून, भविष्यातही बेघर, अनाथ व वृद्धांचे प्रश्न, तसेच रोजगार, शिक्षण, उद्योग आणि अन्याय-अत्याचाराविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरूच राहील, असे जिल्हा संघटक आशिष सलोडकर व जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे यांनी स्पष्ट केले.
या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याचा आदर्श भीम आर्मीने घालून दिल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.