वाहतूक शाखेतील अंमलदारांना शासकीय डॉक्टरांकडून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

Wed 28-Jan-2026,04:10 AM IST -07:00
Beach Activities

वाहतूक शाखेतील अंमलदारांना शासकीय डॉक्टरांकडून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा येथे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अंमलदारांसाठी प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी हे नेहमी रस्त्यावर कर्तव्यावर असतात. अपघाताची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. अशा वेळी जखमींचे प्राण वाचवण्यासाठी डायल १०८ अंबुलन्स येईपर्यंत तातडीची वैद्यकीय मदत कशी द्यावी, याचे सखोल मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.

कार्यशाळेत जखमी व्यक्तीस सुरक्षितरीत्या रस्त्याच्या कडेला हलविताना ३ ते ४ व्यक्तींनी समन्वयाने उचलणे, मान व डोक्याला योग्य आधार देणे, रक्तस्राव थांबविण्यासाठी पट्टी बांधणे, श्वासोच्छ्वास सुरू आहे की नाही याची खात्री करणे, जखमी व्यक्तीस मानसिक धीर देणे आदी बाबींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच शासनाने नव्याने सुरू केलेल्या ‘गुड समारिटन’ ॲप विषयी माहिती देण्यात आली. अपघातस्थळाचे फोटो व व्हिडीओ ॲपवर अपलोड केल्यास तातडीची शासकीय मदत उपलब्ध होऊ शकते, असे सांगण्यात आले.

अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’ काळात जखमींना त्वरित शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जखमी व्यक्तीस कोणतीही सामान्य व्यक्ती रुग्णालयात दाखल करू शकते. अशा मदत करणाऱ्या व्यक्तीस शासनाच्या ‘राहवीर योजना’ अंतर्गत २५ हजार रुपये, तर एखादी संस्था किंवा टीम जखमीचे प्राण वाचविल्यास १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येते, अशी माहितीही देण्यात आली.

CPR (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) पद्धतीद्वारे श्वासोच्छ्वास बंद झाल्यास कशी मदत करावी, याचे प्रात्यक्षिक डॉ. श्रद्धा पटेल, डॉ. योगेश चांदुरकर, डॉ. प्रणय तडस (CPR इमर्जन्सी मॅनेजमेंट, सावंगी हॉस्पिटल) यांनी दिले. तसेच डॉ. सुबोधकुमार व डॉ. पवन भगत (जिल्हा शासकीय रुग्णालय, वर्धा) यांनी डायल १०८ अंबुलन्सची कार्यपद्धती स्पष्ट केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, ASI रियाज खान, ASI सुनील चोपडे, दिलीप आंबटकर, दिलीप कामडी, संजय भांडेकर, मुन्ना तिवारी, किशोर पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे नेतृत्व पो. नि. विलास पाटील (वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा) यांनी केले.