बल्लारपूरमध्ये टिकले वाईन शॉप सील,सात दिवस दुकान बंद
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून आबकारी विभागाच्या कारवाया सातत्याने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या टिकले वाईन शॉपवर आबकारी विभागाने मोठी कारवाई करत दुकान सील केले आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
आबकारी विभागाने टिकले वाईन शॉपमध्ये तपासणी केली असता नियमांचे उल्लंघन व काही त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आबकारी विभागाचे अधिकारी विशाल कोल्हे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, नियम व निर्देशांचे पालन न झाल्याने वाईन शॉप सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, निर्धारित कालावधीनंतरच दुकान पुन्हा सुरू करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, टिकले वाईन शॉपच्या आसपास नेहमीच दारुड्यांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते आणि अनेक वेळा वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवत होती. स्थानिक नागरिकांच्या मते, गर्दी व अव्यवस्थित वाहनांमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता कायमच असायची. याचा त्रास सामान्य नागरिकांसह महिला व विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत होता.
या कारवाईनंतर एकीकडे मद्यप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत असली, तरी दुसरीकडे अनेक स्थानिक नागरिकांनी आबकारी विभाग व जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वाईन शॉप बंद झाल्याने परिसरात काही काळ तरी शांतता राहील तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
आबकारी विभागाच्या माहितीनुसार, ही कारवाई पूर्णतः कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आली आहे. अधिकारी विशाल कोल्हे यांनी स्पष्ट केले की, सात दिवसांची निर्धारित मुदत पूर्ण झाल्यानंतर सर्व नियम व अटींचे पालन सुनिश्चित झाल्यासच टिकले वाईन शॉप पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल.
सध्या टिकले वाईन शॉप सील झाल्याने संपूर्ण बल्लारपूर शहरात ही कारवाई चर्चेचा विषय ठरली असून, आगामी काळात प्रशासनाकडून अशाच प्रकारच्या आणखी कठोर कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.